Thursday, February 25, 2016

पर्यावरण जगणाऱ्या माणसाची गोष्ट

(हा लेख २००५ मध्ये लिहिलेला आहे.)
लहानपणी जर कधी वैदिक गणित शिकण्याच्या वाटेला कुणी गेला असेल तर त्याने ‘दिलीप कुलकर्णी’ हे नाव नक्की ऐकले असेल. वैदिक गणित या विषयावरच्या अतिशय लोकप्रिय अशा चार छोटयाछोटया पुस्तिकांचे हे सहलेखक. यातील चौथे पुस्तक वैशिष्टयपूर्ण अशासाठी आहे, की, याचे पूर्ण पेजसेटिंग हे हाती केलेले आहे. हस्तलिखीत असावे तसे. असे काहीतरी वेगळे करायचे ही कुलकर्णी यांची खासीयतच आहे. मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यावर टेल्को कंपनीतील नोकरी म्हणजे काही वर्षांपूर्वीची अतिशय आदर्श अशी परिस्थिती. आत्ताच्या आयटीमधील लोकांइतके नसले तरी बऱ्यापैकी ऐषोआरामी जीवन जगण्याची ही हमीच. परंतु कुलकर्णी यांचे मन त्यात रमले नाही. स्वत:चा शोध घेण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना, तेव्हा, टेल्कोतील नोकरी सोडून ते ‘विवेकानंद केंद्राचे’ पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. ‘विवेक-विचार’ या केंद्राच्या नियतकालिकाचे संपादन त्यांनी ८-९ वर्षे केले. मग तेही अपुरे वाटू लागले. माणसाच्या जगण्याचा मूलभूत पातळीवर विचार करताना शहरातील जीवनही त्यांना नकोसे झाले आणि १९९३ साली वयाच्या ३५ व्या वर्षी ते कोकणात दाखल झाले. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची डॉक्टर पत्नी व 3 वर्षांचा मुलगा अमेय होता. दापोली-दाभोळ रस्त्यावर पंचनदी नावाच्या गावात दहा जणांनी मिळून काही जागा घेऊन घरे बांधली होती. पर्यावरणविषयक काही विशिष्ट संकल्पना मनात घेऊन हे लोक एकत्र आले होते. त्या प्रकल्पाचे निवासी व्यवस्थापक म्हणून हे कुटुंब पंचनदीस येऊन दाखल झाले. तो प्रकल्प पाहिजे तसा चालला नाही तेव्हा १९९६ साली कुलकर्णी त्यातून बाहेर पडले आणि कुडावळे या गावी घर बांधून रहायला लागले.

वर म्हटल्याप्रमाणे वैदिक गणिताची पुस्तके ही दिलीप कुलकर्णी यांची सर्वतोदूर पसरलेली ओळख. त्याद्वारेच हे नाव प्रथम ऐकले. नंतर त्यांची निसर्गायण, सम्यक विकासाच्या दिशेने, हसरे पर्यावरण, दैनंदिन पर्यावरण यासारखी विविध पुस्तके वाचनात आली. वाचत गेलो तसा या माणसाबद्दल अधिकाधिक जिज्ञासा वाटू लागली. यांना एकदा भेटले पाहिजे असे वाटू लागले. त्यातच नुकताच ‘अंतर्नाद’ मासिकात मिथिला दळवी यांनी लिहिलेला कुलकर्णी कुटुंबाविषयीचा लेख वाचनात आला. त्यानंतर लगेचच दापोली येथे जाण्याचा योग आला, आणि तेथील माझा मित्र श्रीराम महाजन याच्या मदतीमुळे श्री. दिलीप कुलकर्णी यांना भेटण्याचा योगही जुळून आला.
कुडावळे हे गाव, दापोलीपासून १८ किमी अंतरावरील तसे आडरस्त्यावरील गाव आहे. दापोलीपासून दिवसातून दोन तीन एस्टीच्या फेऱ्या या गावात होतात. दापोली-कुडावळे रस्ता चढउतारांचा आणि वळणवळणांचा आहे. निसर्गाचा वरदहस्त लभलेला असा हा प्रदेश आहे. कुडावळे ३००-४०० वस्तीचे गाव असेल. गावापासून अर्धा किमी अंतरावर, डोंगराच्या पायथ्याशी कुलकर्ण्यांचे घर आहे. कुलकर्ण्यांचे घर आपण कल्पनाही करु शकणार नाही एव्हढे साधे आहे. चारही बाजूंनी उतरते छप्पर असणारे, दोन खोल्या व एका ओसरीचे छोटेसे घर. घरात बल्ब आणि एक रेडीओ याखेरीज आधुनिक यंत्रसामग्रीचे नाव नाही. पुस्तकांनी खचाखच भरलेल्या भिंती, अतिशय साध्या दोन कॉटस् आणि घराला शोभतील असेच, दाढीधारी पुराणपुरुष दिलीप कुलकर्णी.
कुलकर्ण्यांच्या घराच्या मागच्या बाजूला प्रचंड पसरलेली देवराई आहे. देवराई म्हणजे देवाला अर्पण केलेली जमीन. त्यातील एखादी ओली फांदीदेखील कुणी तोडत नाही. शेकडो एकर पसरलेली ही देवराई म्हणजे माणसाच्या राक्षसी भुकेपासून वाचलेले पृथ्वीवरील जणू नंदनवनच. त्यातील बऱ्याच भागाला कित्येक वर्षांत माणसाचा पायही लागलेला नाही. निसर्गाला तिथे आपले नियम पाळता येतात. तेथील पर्यावरण माणसाच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे. अशा देवराईच्या सान्निध्यातील कुलकर्ण्यांच्या घराला पंख्यांची खरेच गरजच नाही.
दिलीप कुलकर्णी बोलत असतात. विविध विषयांवरची त्यांची जगावेगळी मते सांगत असतात. जिथे माणसाला त्याच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचायला लिफ्ट म्हणजे पर्यायाने ऊर्जा लागते त्या माणसांबद्दल, दोन दोन तास कामाच्या जागी पोहोचायला आणि तितकेच परत घरी जायला लागणाऱ्या माणसांबद्दल, ते अनाठायी खर्च करीत असलेल्या ऊर्जेबद्दल, शहरांच्या उभ्या वाढीबद्दल, ही सगळी प्रगती करीत असताना आपण पर्यावरणाचे जे भरुन न येणारे नुकसान करीत आहोत त्याबद्दल. उर्जेचा अधिकाधिक वापर हा प्रगतीचा मानदंड मानणारे विकासाचे रोडमॅप्स चुकीचे आहेत असे ते सांगतात.
एलपीजी गॅस हे चुलीपेक्षा स्वच्छ इंधन आहे अशी आपली सर्वसाधारण समजूत. पण हा गॅस आपल्या घरात येईपर्यंत कोणकोणत्या अवस्थांमधून जातो व त्याच्या वाहतुकीमुळे किती प्रदुषण निर्माण होते याचा विचार करता, अंगणातील झाडाची लाकडे हे कितीतरी चांगले इंधन आहे हे थिअरीमध्येतरी आपल्याला पटते. अशा जगण्यातील लहानलहान गोष्टींतून आपण पर्यावरणावर कसे अमानुष घाव घालीत असतो याची झलक दिलीप कुलकर्ण्यांशी बोलताना ठायीठायी होते.
मी त्यांना माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीविषयी, त्यातून भारतात निर्माण होणाऱ्या सुबत्तेविषयी विचारतो. त्यांच्या मते एवढा पैसा हातात असून उपभोग घ्यायला वेळ नाही अशी माणसांची गत झाली आहे. नुसता पैसा कमवून त्यातून शाश्वत असे काहीच हाती लागणार नाही. मानवी संस्कृतीचा आजचा प्रवास चुकीच्या दिशेने प्रगती करीत चालू आहे असे त्यांना वाटते. इंटरनेटवरील माहितीचा महासागरही त्यांना निरुपयोगी वाटतो. एवढी प्रचंड माहिती मिळवायची तर त्यासाठी किती जन्म घालवावे लागतील असा प्रश्न ते करतात. या माहितीतून अनेक परस्परविरुध्द मते सिध्द करता येतील असे त्यांचे म्हणणे. माणसाला एवढया माहितीची गरजच नसल्याचे ते सांगतात. इमेल आणि इंटरनेटवरील संवाद साधण्याच्या इतर पध्दतीही त्यांना कृत्रीम आणि म्हणूनच खोटया वाटतात. त्यातून माणसामाणसातील संवाद खऱ्या अर्थाने होत नाही असे ते म्हणतात.
दिलीप कुलकर्णी यांची जीवन जगण्याची पध्दत प्रत्येकाला शंभर टक्के पटेल असे नाही. त्यांच्यासारखे जगणे जमणारा तर लाखात एखादा सापडेल. पण तरीही ते म्हणतात त्यात तथ्य आहे असे आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकालाच वाटेल. पर्यायी विकासाची जी वाट ते दाखवित आहेत त्या वाटेवर एखादे तरी पाऊल टाकणे मनात आणले तर प्रत्येकाला निश्चितच जमेल. त्यांच्या घरातून निघताना त्यांना वाकून नमस्कार करावासा मला वाटला. आयुष्यात कधीतरी त्यांच्यासारखं जगण्याची शक्ती लाभावी असे वाटले.
मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

दिलीप कुलकर्णींविषयी

  • 1978 मध्ये अभियांत्रिकीची पदविका
  • 1978 – 1984 पुण्याला टेल्को कंपनीमध्ये नोकरी
  • 1984 – 1993 विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे पुर्ण-वेळ काम. ‘विवेक-विचार’ या नियतकालिकाचे संपादन.
  • 1993 पासून – ‘पर्यावरण’ जगण्यासाठी कोकणातील एका खेडयात सहकुटुंब स्थायिक. विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने, मराठी व इंग्रजीतून स्फुट-लेखन.

दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके

  • वैदिक गणित (भाग 1 ते 4) (सहलेखन)
  • निसर्गायण
  • अणुविवेक
  • वेगळया विकासाचे वाटाडे
  • दैनंदिन पर्यावरण
  • सम्यक् विकास
  • Ahead to Nature
  • ‘Sffron’ Thinking – ‘Green’ Living
  • चरित्र – जगदीशचंद्र बसू.

याखेरीज दिलीप कुलकर्णी ‘गतीमान संतुलन’ हे चार पानी मासिक चालवितात. त्याची वार्षिक वर्गणी रु. 30 आहे.

No comments:

Post a Comment