Thursday, February 25, 2016

निसर्गायण शिबीराने जीवनशैलीविषयक विचारांना योग्य दिशा दिली (सप्टेंबर 3, 2009)

(2006 सालच्या अखेरीस कुडावळयाला निसर्गायण शिबीराला गेलो होतो.)
कुडावळयाला शिबीराला आलो होतो त्याला जवळजवळ दिड वर्ष होऊन गेले. शिबीरानंतर जगण्यात काय फरक पडला याचा विचार बऱ्याचदा मनातल्या मनात केला आहे. तसे सांगण्यासारखे फार काही मोठे आहे असे नाही, तरीही जे आहे ते सांगतो. प्रथम हे सांगायला हवे की शिबीरामुळे माझया विचार करण्याच्या पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल झाला. हे हवे, ते हवे अशी वखवख कमी झाली. भौतिक सुखांना अंतीम ध्येय मानणारी विकासाची प्रस्थापित व्याख्या नाकारण्याचे आत्मिक बळ विचारांच्या पातळीवर तरी मिळवू शकलो. दिलीपरावांसारखे जगण्याची हिम्मत आजही माझयात नाही. इच्छा, आकांक्षा आजही आहेत. मात्र मनाची शांती नक्कीच पूर्वीपेक्षा अधिक आहे. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर ते मी अधिक शांतपणे स्विकारायला शिबीरातून शिकलो.
व्यावहारिक पातळीवरही छोटे छोटे बदल घडून आले. सर्वप्रथम पिशवीतून घरी येणारे दूध बंद केले. आम्ही 10 वर्षांपूर्वी ज्या दूधवाल्यांकडून दूध घेत होतो, त्यांचे दूध पुन्हा सुरु केले. दूधाच्या बाबतीत आणखी एक प्रयोग केला. शीतकपाटात दूध ठेवणे बंद केले. त्यामुळे दूधातील स्निग्धांश अधिक प्रमाणात दूधातच टिकून राहतो व दूध चवीला अधिक चांगले लागते असे आढळून आले. (शीतकपाटात ठेवलेल्या दूधाची साय जाड होऊन खालचे दूध अतिशय पातळ होत असे.) यात दूध अधिक वेळा उकळायला लागते, मात्र दूध कायम कक्ष तापमानालाच असल्याने ते बरेच लवकर उकळते.
दूसरा बदल म्हणजे कपडे धुण्याच्या यंत्राचा रोज होणारा वापर बंद केला. अंघोळीनंतर स्वत:चे कपडे स्वत:च धुण्याची सवय घरातील सर्वांनीच लाऊन घेतली. याला केवळ 10 मिनीटे अधिक लागतात. मात्र यामुळे कपडे अधिक स्वच्छ राहतात, तसेच अधिक टिकतात असे आढळून आले.
दिलीपरावांनीच गेल्या अंकात म्हटल्याप्रमाणे ‘उटणे वापरणे’ ही पर्यावरणस्नेही जीवनातील सर्वाधिक सोपी गोष्ट असल्याने ती लगेच अंगीकारली. उटण वापरणे ही ‘आपण पर्यावरणस्नेही असल्याचा’ फील गुड जागवते हे खरेच. मात्र त्याचा फायदा होतो हे ही तेव्हढेच खरे. उटणे साबण व दुर्गंधीनाशक असा दुहेरी परिणाम करते. त्वचेचे आरोग्यही अधिक चांगले राहिल्याचे आपले आपल्याला जाणवते.
दिवे, पंखे यांचा वापर आवश्यक तेव्हढाच करणे, कागद जपून वापरणे, थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणे अशा अनेक लहान लहान गोष्टी आपोआप हातून घडायला लागल्या. एप्रिल 2008 च्या अंकात उल्लेखलेले 4 ही संकल्प आमच्याकडून पाळले जातात. स्वयंचलित दुचाकी वाहन घेण्याचे आधीपासूनच जाणीवपूर्वक टाळले होते.
या गोष्टी ‘दर्या मे खसखस’ आहेत याची मला जाणीव आहे. केलेल्या गोष्टींपेक्षा न केलेल्या गोष्टींची यादी फार मोठी आहे. मात्र पर्यावरणस्नेहाचे बीज मनात रुजले की गोष्टी आपोआप घडतात असे लक्षात आले. आपोआप घडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी बाहेरील ऊर्जा लागत नसल्याने त्या कायम होत रहातात. जीवनशैलीविषयक विचारांना योग्य दिशा देण्याचे काम शिबीराने केले एवढे मात्र नक्की.
मंदार परांजपे
mandarrp@gmail.com

No comments:

Post a Comment